Oct 04, 2025 - by Welcome To Kalyan
15 views
बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकरी बांधवांवर ओढावलेल्या संकटाने संपूर्ण राज्याला हेलावून सोडले आहे. शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, जनावरांचा मृत्यू झाला, घरगुती साधनं नष्ट झाली, आणि उपजीविकेचा आधारच ढासळला. अशा काळात राज्यभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. या सामाजिक जबाबदारीतून कल्याण आगारातील एसटी चालक आणि वाहक कर्मचारी देखील मागे राहिले नाहीत.
कल्याण एसटी आगारातील तब्बल 50 कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपला एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम “पूरग्रस्त शेतकरी मदत” म्हणून देण्यात आली असून, या कार्यातून एसटी कर्मचाऱ्यांनी हे दाखवून दिलं की लालपरी ही केवळ प्रवासाचं साधन नसून समाजाच्या संकटकाळी उभी राहणारी खरी जीवनरेषा आहे.
हा उपक्रम सेवा-शक्ती-संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कल्याण आगार यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला आहे. या मोहिमेचं मार्गदर्शन विकी तरे यांनी केलं. त्याचबरोबर विभागीय टीममधील सागर तुपलोंढे, संदेश पंडीतकर तसेच आगारातील आतिश बुचडे, निकेश तोडसाम आणि विवेक उईके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या योगदानाचा निर्णय विशेष म्हणजे आ. गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर घेण्यात आला. साध्या समारंभाऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत कर्मचाऱ्यांनी "फुल नाही पण फुलाची पाकळी" या भावनेतून आपला पगार शेतकरी बांधवांसाठी अर्पण केला. हा gesture सामाजिक संवेदनशीलतेचा उत्तम आदर्श ठरतो.
अतिवृष्टीमुळे झालेल्या विध्वंसामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आणि अनिश्चिततेचं वातावरण पसरलं आहे. अशा वेळी एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान ही फक्त आर्थिक मदत नाही तर मानसिक आधारही आहे. “समाजासाठी आपलं कर्तव्य” या भावनेतून दिलेला हा हातभार बीड-धाराशिव मदत मोहिमेला नक्कीच गती देईल.
Recent comments(0)