मतदान जनजागृतीसाठी कल्याणात निघाली भव्य बाईक रॅली
केडीएमसी आयुक्तांसह अधिकारीही झाले सहभागी
कल्याण दि.10 मे :
पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगानेही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेमध्ये मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये केडीएमसी आयुक्तांसह अनेक अधिकारी शहरांतील शिक्षक वर्ग आणि जागरूक नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील केडीएमसी अंतर्गत येणाऱ्या विधानसभांमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील कमी मतदानाची टक्केवारी पाहता त्यामध्ये वाढ होण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून आज ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. येत्या 20 तारखेला मतदारांनी त्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार मोठ्या संख्येने बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले.
Recent comments(0)